राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या डे–नाईट प्रिमियम लिग क्रिकेटचा थरार

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जाणता राजा मैदानावर चौकार-षटकारांची आतिषबाजी

संगमनेर विजय कापसे दि १० फेब्रुवारी २०२६–
काँग्रेसचे वरिष्ठ नेते मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानावर भव्य अशा डे–नाईट प्रिमियम लिग क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमुळे स्थानिक तसेच परिसरातील क्रिकेटपटूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची उत्तम संधी मिळत आहे. षटकारा -चौकारांची आतिषबाजीचा थरार प्रेक्षक अनुभवत आहेत.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे स्पर्धेचे बारावे वर्ष असून शुक्रवार (ता. ६) पासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा शुक्रवार (ता. १३ फेब्रुवारी) पर्यंत सुरू राहणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक: ₹१ लाख ५१ हजार १५१ रुपये, द्वितीय क्रमांक: ₹७५ हजार १७५ रुपये,तृतीय क्रमांक: ₹५१ हजार १५१ रुपये, चतुर्थ क्रमांक: ₹४१ हजार १४१ रुपये, अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या क्रिकेट स्पर्धेची खास बाब म्हणजे सामने डे–नाईट स्वरूपात खेळवले जात असून त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

हे सामने पाहण्यासाठी जाणता राजा मैदानावर तरुणांची गर्दी होत आहे. चौकार–षटकारांच्या आतषबाजीमुळे प्रत्येक सामना रंगतदार ठरत असून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन होत आहे. स्पर्धेसाठी मैदानाची देखील अत्यंत दर्जेदार तयारी करण्यात आली असून खेळाडूंना उत्तम खेळपट्टी व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट क्रिकेटपटू घडावेत आणि स्थानिक क्रिकेटला चालना मिळावी, हाच आयोजकांचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. खऱ्या अर्थाने ही डे–नाईट प्रिमियम लिग क्रिकेट स्पर्धा क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी ठरत असून संगमनेरच्या क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे. हे सामने दुपारी चार वाजले पासून सुरू असून सर्व नागरिकांनी या डे नाईट क्रिकेट सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थानिक युवकांना क्रिकेटसाठी मोठे व्यासपीठ – डॉ जयश्रीताई थोरात
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील युवकांना करिअर ,कला ,क्रीडा व त्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने विविध प्रकारचे व्यासपीठ निर्माण करून देण्यात आले आहे. या माध्यमातून तालुक्यातील सर्व युवकांना मोठी संधी असून राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या वतीने क्रिकेट प्रेमी युवकांना मागील सहा वर्षापासून खेळण्याची संधी मिळत आहे. आयपीएलच्या धरतीवर हे सामने होत असून प्रेक्षकांसाठीही एक आनंदाची पर्वणी आहे. यामधून नक्कीच संगमनेरच्या युवकांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर संधी मिळेल असा विश्वास व्यक्त करताना क्रिकेट हा सर्वांना बांधून ठेवणारा खेळ आहे. अत्यंत चांगले नियोजन हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य असून अधिकाधिक नागरिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.
दर्जेदार सुविधाराजवर्धन युथ फाऊंडेशनच्या डे नाईट प्रीमियम लीग साठी अत्यंत सुंदर मैदान बनवण्यात आली असून फ्लडलाईट, प्रेक्षक गॅलरी, डीजे व्यवस्था, ऑनलाइन प्रक्षेपण, मराठी हिंदी समालोचन, खेळाडूंना वेगवेगळ्या रंगाचे कपडे, याचबरोबर भव्य स्टेज, अत्यंत दर्जेदार सुविधा असल्याने ही स्पर्धा राज्यातील नावाजलेली स्पर्धा ठरत आहे.








