आ.थोरात यांच्या प्रयत्नातून चिकणी तलाठी कार्यालय मन सुरू – आमदार सत्यजित तांबे
चिकणी व निमगाव भोजापुर साठी स्वतंत्र तलाठी सजा कार्यालय
चिकणी येथे नवीन तलाठी सजा कार्यालयाचा शुभारंभ आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कॉम्रेड कारभारी उगले, दूध संघाचे संचालक विलासराव वर्पे, भारत वर्पे, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद वर्पे, सरपंच गायत्री माळी, उपसरपंच चंद्रभान मुटकुळे, राजेंद्र चांगदेव वर्पे, दत्त वर्पे,माधव वर्पे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व चिकणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी साडेसहा वर्ष राज्याचे महसूल मंत्री पद सांभाळले या कार्यकाळात अनेक ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतले ऑनलाईन सातबारा, 80 लाख दाखले विद्यार्थ्यांना शाळेत देण्याचा विक्रम त्याच कार्यकाळात झाला. याचबरोबर अनेक वर्ष भिजत पडलेला खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी सोडवला. महसूल कामकाजात सुलभता यावी याकरता या विभागाची संगणकीकरण केले. संगमनेर मध्ये अनेक वैभवशाली इमारती उभ्या केल्या. याचबरोबर संगमनेर तालुक्यात अद्यावत नऊ तलाठी कार्यालय उभारली.
महाविकास आघाडीच्या काळात महसूल मंत्रीपद असताना चिकणी व परिसरातील नागरिकांच्या मागणीवरून चिकणी व निमगाव भोजपूर गावासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय मंजूर केले. याचबरोबर आपल्या भागाला वरदान ठरणारी निळवंडे धरणाचे कालवे मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. निळवंडे धरण व कालवे हे आमदार बाळासाहेब थोरात यांनीच पूर्ण केले असून त्यांनी दुष्काळी जनतेला कालव्यांद्वारे पाणी दिले आहे.
सातत्याने जनतेमध्ये राहणारा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांची ओळख असून ग्रामीण विकासातून संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरले आहे. ही विकासाची वाटचाल यापुढेही कायम राहणार असून सर्वांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी भक्कम उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले.
कॉम्रेड कारभारी उगले म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात हे राज्याचे नेतृत्व करत आहेत. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा लोकप्रतिनिधी ही त्यांची ओळख असून त्यांनी संगमनेर व आकोले तालुक्याचा लौकिक देशात निर्माण केला असल्याचेही ते म्हणाले.
तर विलासराव वर्पे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या मात्र जाहिरात केली नाही. काही लोक असे आहेत की त्यांना कामही माहीत नाही परंतु ते खोटी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना जनता थारा देणार नाही असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद वर्पे यांनी केले तर भारत वर्पे यांनी आभार मानले. यावेळी चिकणी व निमगाव भोजापुर मधील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.