कॅन्सर जनजागृतीसाठी विद्यार्थिनींनी काम करावे – डॉ.जयाताई थोरात
घाबरू नका, कॅन्सर बरा होतो; अमृतवाहिनी मॉडेल स्कूल मध्ये महिलांचे आरोग्य व कॅन्सर बाबत जनजागृती
संगमनेर विजय कापसे दि २९ सप्टेंबर २०२४– व्यस्त जीवनशैली व अनियमित आहार यामुळे वाढणारे कॅन्सरचे प्रमाण हे चिंताजनक आहे मात्र वेळीच निदान आणि योग्य उपाय केला तर कॅन्सर पूर्णपणे बरा होतो त्यामुळे कॅन्सरला न घाबरता लढले पाहिजे. महिलांची आरोग्य ही मोठी समस्या असून कॅन्सर व महिलांच्या आरोग्याबाबत विद्यार्थिनींनी जनजागृती काम करावे असे आवाहन कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.
अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने द्रोणागिरी हॉलमध्ये विद्यार्थिनींसाठी आरोग्याबाबत मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे अध्यक्ष राखी कारवा होत्या. तर व्यासपीठावर स्त्री रोगतज्ञ डॉ.प्रमोदिनी सानप, आहार तज्ञ डॉ.साक्षी सोमानी, खजिनदार श्वेता जाजू, प्राचार्य श्रीमती शितल गायकवाड, विभाग प्रमुख शोभा हजारे, वैजयंती रनाळकर, अनुपमा राहणे उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, मा.शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात,मा.आ..डॉ.सुधीर तांबे व संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयू ताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनीतील सर्व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास व करियरसह आरोग्याबाबत संस्थेकडन सातत्याने विशेष काळजी घेतली जात आहे. कॅन्सर बाबत समाजात मोठी भीती निर्माण झाली आहे.ब्लड कॅन्सर हाडाचा कॅन्सर, फुफुसाचा व इतर कॅन्सर बाबत त्यांनी माहिती देताना वेळीच निदान झाले तर कॅन्सर शंभर टक्के पूर्ण बरा होतो असे सांगितले. यावेळी ग्रामीण भागामध्ये महिलांच्या आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणात समस्या असून विद्यार्थिनींनी आपल्या कुटुंबातील व नात्यातील महिलांच्या आरोग्याबाबत सजग व्हावे. चांगला आहार, विश्रांती आणि नियमित व्यायाम ही त्रिसूत्री पाडल्यास आपण कोणत्याही आजारावर मात करू शकतो. मोबाईल व ऑनलाइन वाचण्यापेक्षा पुस्तके वाचा असा सल्लाही डॉ.थोरात यांनी विद्यार्थिनींना दिला.
तर आहार तज्ञ साक्षी सोमानी म्हणाल्या की, फिटनेस च्या नावाखाली अनेक तरुणी व महिला आहाराबाबत चुकीची संकल्पना राबवत आहे. निरोगी शरीरासाठी आहार अत्यंत गरजेचा असून चांगल्या आहारामुळेच अनेक विकारांवर मात करता येतो. मुलींनी आपल्या घरामध्ये आहाराबाबत अधिक जागरूक असावे असे त्या म्हणाल्या. तर डॉ.प्रमोदिनी सानप म्हणाल्या की, स्त्रियांचे आजार हे वेळीच उपचार न केल्याने वाढत जातात. अनेक महिला आजार लपवतात म्हणून आजाराबाबत कोणीही चालढकल न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या असे सांगताना किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राखी करवा यांनी केले तर प्राचार्य शितल गायकवाड यांनी आभार मानले.