वारकरी संप्रदायातून मानवतेचा ज्ञान यज्ञ – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
सप्ताह मधून वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे
साकुर येथे ब्रह्मलीन माणिक गिरी व बिरोबा महाराज देवस्थान यांच्यावतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह ते बोलत होते. यावेळी हरिभक्त परायण दत्तगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले. याप्रसंगी सभापती शंकर पाटील खेमनर, संचालक इंद्रजीत खेमनर यांचासह गावातील विविध नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा.मंत्री थोरात म्हणाले की, थोर परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचे काम अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून पुढे नेले जात आहे. संत तुकाराम ज्ञानेश्वर यांसह विविध समाजातील अनेक संतांनी मानवतेचा मंत्र दिला. आणि वारकरी संप्रदायातून सातत्याने हा बंधू भावाचा आणि विश्वशांतीचा ज्ञान यज्ञ सुरू आहे.
वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर पक्ष जात – पात काही नाही. इथे सर्व समान असतात सर्वजण एकत्र येऊन हा आनंद लुटतात. अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये हा सप्ताह संपन्न होत असून यापूर्वी चौधरवाडी आणि वरवंडी येथे सुद्धा मोठा सप्ताह झाला होता.
ब्रह्मलीन गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहात आपण लहानपणी अनेकदा वाढपी म्हणून काम केले. या आठवणी असतात. संत तुकारामांची गाथा पाण्यात बुडवली परंतु ती अनेकांच्या मुखगत असल्याने पुन्हा ते अभंग लिहिले गेले आणि ही किमया वारकरी संप्रदायातूनच घडू शकते. हा एक संस्मरणीय आनंद सोहळा असून सर्वांच्या लक्षात राहणारा असल्याचे ते म्हणाले. यावेळी हरिभक्त परायण दत्तगिरी महाराज यांनी काल्याच्या कीर्तनातून अध्यात्म आणि समाज या विषयी प्रबोधन केले. या सप्ताहसाठी साकुर आणि पंचक्रोशीतील अनेक भाविक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.