अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलचा आर्टिस्ट इन रेसिडेंट उत्साहात संपन्न
अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल चा आर्टिस्ट इन रेसिडेंट उपक्रम कौतुकास्पद – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा संपूर्ण सहभागातून आर्टिस्ट इन रेसिडेन्स 2024 हा सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी समवेत कांचनताई थोरात संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख, चित्रपट नृत्यदिग्दर्शक ऋषिकेश पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव, रत्नमाला देशमुख, प्राचार्य अंजली कन्नावर आदी उपस्थित होते. मागील पाच वर्षापासून संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख यांच्या संकल्पनेतून आर्टिस्ट इन प्रेसिडेन्स हा प्रोग्राम राबवला जात आहे.यामध्ये स्टेजवरील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागाबरोबर कार्यक्रमाची लाईट व्यवस्था, निमंत्रण पत्रिका ,साऊंड सिस्टिम, रेकॉर्डिंग, फोटोग्राफी, बैठक व्यवस्था, याचबरोबर पार्किंग व्यवस्था, सत्कार कमिटी, पालकांची बैठक व्यवस्था, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत या सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनी सांभाळल्या यामुळे कार्यक्रमाची परिपूर्ण कल्पनेबरोबर नियोजनात विद्यार्थ्यांच्या सहभाग राहिल्याने विद्यार्थ्यांसाठी हा मोठा अनुभव ठरत आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात श्री.गणेशाला वंदन करून झाली, कोळीगीत, लोकगीत ,भारुड, याचबरोबर विविध सामूहिक नृत्य, लावणी पोवाडा अशा भरगच्च कार्यक्रमांमधून सुमारे ६५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला द मॅन्युफेस्ट मॅजिकल एडवेंचर ऑफ माईंड स्टेट या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, पुणे नंतर आता संगमनेर हे शिक्षणाचे माहेरघर ठरले आहे.अमृतवाहिनी संस्थेने विद्यार्थी परिपूर्ण घडवण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले असून आर्टिस्ट इन रेसिडेंस या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या नियोजनाची सर्व जबाबदारी दिली आहे. अगदी लहान बालकांनी यामध्ये सहभाग घेऊन हा कार्यक्रम परिपूर्ण बनवला असल्याने हा कार्यक्रम नक्कीच इतरांसाठी दिशादर्शक आहे. स्टेजवरील कार्यक्रम आणि स्टेज मागील सर्व व्यवस्था विद्यार्थ्यांनी सांभाळून या नवीन कार्यक्रमातून नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. अमृतवाहिनी नीडो इंटरनॅशनल स्कूल गुणवत्तेमुळे आपला राज्यभरात लौकिक निर्माण केला असल्याचे ते म्हणाले.
तर शरयूताई देशमुख म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबर त्यांना कार्यक्रमाच्या पूर्ण नियोजनामध्ये सहभागी करून हा उपक्रम राबवला आहे तर ऋषिकेश पवार म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठे कलागुण असून त्यांना अमृतवाहिनीने सातत्याने मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या कार्यक्रमात स्टुडन्ट ऑफ द इयर म्हणून सिया पाचोरे आणि पृथ्वीराज नेहे यांना गौरवण्यात आले तर नीता खरडे यांना आदर्श शिक्षिका म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सौ.अंजली कन्नावार यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.