मा. मंत्री बाळासाहेब थोरात व आ. सत्यजित तांबे यांचा पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा
मा. मंत्री बाळासाहेब थोरात व आ. सत्यजित तांबे यांचा पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा
संगमनेर विजय कापसे दि १६ जानेवारी २०२५– काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुणे-नाशिक रेल्वे मार्ग संगमनेर वरून व्हावा यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. हा प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग हा पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. मात्र, या प्रकल्पाला ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) प्रकल्पामुळे अडथळा येत असल्याने काम रखडले होते. आता तर हा मार्गच बदलण्यात आला असून संगमनेरसह सिन्नरकरांना याचा मोठा धक्का बसला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी व प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विधान परिषद सदस्य आ.सत्यजित तांबे यांनी सातत्याने संघर्ष केला असून यापुढेही या प्रकल्पासाठी संघर्ष करणार असल्याचे आ. तांबे यांनी सांगितले.
पुणे-संगमनेर, सिन्नर -नाशिक हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास या भागातील वाहतूक कोंडी दूर होईल. शेतमालाची सुलभ वाहतूक, स्थानिकांना रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहज प्रवास, आणि पर्यटकांसाठी शिर्डी, त्र्यंबकेश्वर, ओझर लेणी यांसारख्या स्थळांची जोडणी मिळणार आहे. हा रेल्वेमार्ग फक्त दळणवळणाचा नव्हे, तर पर्यटन आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. आ. सत्यजित तांबे यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी विधानसभा व विधान परिषदेत वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यांनी या प्रकल्पाच्या अडथळ्यांसाठी जबाबदार कारणे मांडत जीएमआरटी प्रकल्पाजवळून रेल्वेमार्ग वळवण्याचा पर्याय सुचवला. सह्याद्रीच्या निसर्गरम्य पट्ट्यातून १५-२० किमी वळसा घेऊन प्रकल्प राबवता येईल, असे त्यांनी सविस्तरपणे मांडले. आ.तांबे यांनी या प्रकल्पाचे महत्त्व सांगताना, पुणे- नाशिक या दोन महानगरांमधील अंतर कमी होऊन, दळणवळण अधिक गतिमान होईल, असे नमूद केले आहे. या मार्गासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. केंद्र सरकार, रेल्वे मंत्रालय व स्थानिक प्रशासन यांच्याशी समन्वय साधून तांत्रिक व आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
आ. सत्यजित तांबे यांनी या प्रकल्पासाठी सर्व राजकीय नेत्यांनी पक्षभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन केले आहे. चाकणसारख्या औद्योगिक हबला या प्रकल्पामुळे मोठा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी उपाय म्हणून या रेल्वेमार्गाची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
आ.सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग हा प्रकल्प साकार होईल, अशी स्थानिकांना अजूनही आशा आहे. या प्रकल्पामुळे या भागातील लोकांचे जीवनमान उंचावेल, हे निश्चित आहे. मात्र रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या प्रकल्पाचा मार्ग शिर्डीमार्गे वळवून संगमनेर, सिन्नरकरांच्या तोंडाला पाणी पुसले. असून हा मार्ग संगमनेर वरूनच झाला पाहिजे यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू वेळप्रसंगी या रेल्वेमार्गासाठी सिन्नर -संगमनेर- जुन्नर येथील नागरिकांनी संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची सर्वांनी तयारी ठेवावी असे आवाहनही आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे