माजीमंत्री बाळासाहेब थोरात, अजिंक्य रहाणे, आ.सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत डिजिटल चळवळीचा प्रारंभ
संगमनेरकरांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी मोठी मदत – अजिंक्य रहाणे
संगमनेर विजय कापसे दि २० जानेवारी २०२५– मोठे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या संगमनेर शहर व तालुक्याचे नाव विकास कामातून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देशात पोहोचवले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून जगभर गेलेल्या सर्व तरुणांना एकत्र जोडणे याचबरोबर संगमनेरचा इतिहास, संस्कृती आणि माहिती जगभरातील व्यक्तींना पोहोचवण्यासाठी आय लव संगमनेर ही चळवळ सुरू झाली असून यामधून संगमनेरकरांना एकत्र जोडले जाईल असा विश्वास भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी व्यक्त केला आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे आय लव संगमनेर या चळवळीचा शुभारंभ झाला. यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात, संगमनेरचे भूषण अजिंक्य रहाणे, आयोजक आमदार सत्यजित तांबे, राजवर्धन थोरात, गिरीश मालपाणी यांच्यासह विविध मान्यवर व हजारो युवक उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. सततच्या विकास कामांमधून संगमनेरची ओळख ही राज्याला समृद्ध आणि विकसित असलेला तालुका म्हणून झाली आहे. विविध क्षेत्रातील व्यक्तींनी तालुक्याचे नाव मोठे केले असून या सर्वांचा आपल्याला अभिमान आहे. अजिंक्यने संगमनेरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. तो खेळत असताना प्रत्येक संगमनेरकर तसेच अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील नागरिकाला त्याचा सार्थ अभिमान असतो. त्याने सातत्याने संगमनेर मध्ये येऊन तरुणांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करावे असेही ते म्हणाले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हे देशात ओळखले जात आहे. आणि अजिंक्य रहाणे यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संगमनेरचे नाव पोहोचले आहे. शिक्षणातून आपल्या तालुक्यातील अनेक युवक वेगवेगळ्या देशांमध्ये असून या सर्वांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी आय लव संगमनेर ही डिजिटल चळवळ सुरू झाली आहे.
यामधून संगमनेर तालुक्याची माहिती, इतिहास,सांस्कृतिक देवाणघेवाण, याचबरोबर शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा, व्यापाऱ्यांसाठी सुविधा, नवीन उद्योजकांसाठी मार्गदर्शन, तरुणासाठी करियर मार्गदर्शन, क्रीडा मार्गदर्शन, कला व क्रीडा, सांस्कृतिक असे वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत. याचबरोबर संगमनेर तालुक्यातील प्रश्न सोडवणे साठी ही मोठी मदत होणार आहे. यामध्ये सर्व तरुण व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
तर कसोटी पटू अजिंक्य रहाणे म्हणाले की, संगमनेर मला कायम ऊर्जा देते. सौ शहरी एक संगमनेरी ही घोषणा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची असून जगभरात असलेल्या व्यक्तींनी संगमनेर मध्ये काम करावे आणि संगमनेर मधील व्यक्तींनी जगभरासाठी काम करावे याकरता ही चळवळ महत्त्वाची दुवा ठरणार आहे. यावेळी उपस्थित हजारो युवकांनी एकच जल्लोष केला.
संगमनेरमधील क्रिकेट अकॅडमीला मार्गदर्शन करणार – अजिंक्य रहाणे
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल हे यापुढे युवकांना खेळण्यासाठी सदैव खुले राहणार असून जयहिंद क्रिकेट अकॅडमी मधून तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले तर अनुभव नेहमी इतरांना सांगितला पाहिजे. त्यातून इतरांना प्रेरणा मिळते मला संगमनेर मध्ये यायला खूप आवडते. आगामी काळात मी येथे येऊन खेळणार आहे. दोन – तीन दिवस येथे आल्यानंतर येथील तरुणांना अनुभव सांगायला व मार्गदर्शन करायला नक्की आवडेल. तसेच क्रिकेट अकॅडमीला मार्गदर्शन करू असे भारताचा स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांनी सांगितले. यावेळी तरुणांनी त्याचे अभूतपूर्व स्वागत केले.