आत्मविश्वास हाच महिलांचा खरा दागिना – मा.आ. स्नेहलताताई कोल्हे
आत्मविश्वास हाच महिलांचा खरा दागिना – मा.आ. स्नेहलताताई कोल्हे
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि ८ मार्च २०२६–आपला आत्मविश्वास हाच आपला दागिना असून, महिला भगिनींनो तुमच्या चेहऱ्यावर कायम भक्कम असा आत्मविश्वास असला पाहिजे. भलेही काहीही संकट येऊ द्या, मला संकटाच्या ढिगाऱ्यावर उभं राहायचं, हाच ध्यास मनात बाळगायचा आहे. ऊन आहे, सावली आहे; जसं दिवस आहे तशी रात्र आहे; तसे सुखही आहे आणि दुःखही आहे. आपल्या सर्व भगिनींना सुखही आणि आनंदही पाहिजे असतो, परंतु त्यासोबत एखादं दुःखही आलं तरी ते पेलवायची ताकद आम्हाला सर्व महिला भगिनींमध्ये निर्माण करायची आहे. सर्व महिला भगिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा असल्याचे प्रतिपादन कोपरगावच्या मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.
जाहिरात
सरकार मान्यता प्राप्त नवक्रांती कौशल्य विकास प्रशिक्षण अकॅडमी, कोपरगाव तसेच जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शिलाई मशीन व आरी वर्क या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन व सर्टिफिकेट वितरण कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी त्या महिलांना मार्गदर्शन करताना व्यासपीठावर बोलत होत्या. यावेळी मतदारसंघातील विविध कर्तुत्ववान महिलांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास सहकार महर्षी कोल्हे कारखाना संचालक रमेश घोडेराव, नवक्रांती संस्थेचे संस्थापक चंद्रकांत बागुल,राजश्री बागुल आदींसह महिला भगिनी व विविध प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
जाहिरात
त्या पुढे बोलताना म्हणाल्या, छत्रपती शिवरायांनाही माँ जिजाऊनी घडवलं म्हणून स्वराज्याची निर्मिती झाली.एका स्त्रीमध्ये भरपूर ताकद आहे. देशातील प्रत्येक महापुरुष हा एका स्त्रीच्या पोटी जन्मलेला आहे आणि त्या माऊलीनेच त्याला घडवलेले आहे. म्हणून प्रत्येक नवीन जीवास जन्म देण्याची ताकद आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे. स्त्रीशक्ती ही लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा आणि अन्नपूर्णा या रूपांत आहे. बाई माणसाचा जन्म हा आपला अभिमानाचा आहे. महिलांच्या जीवनात आव्हानं खूप आहेत, परंतु आपल्याला या परिस्थितीशी मिळत-जुळत करून घ्यायचं आहे. आपल्यापुढे इतिहास आहे की यापूर्वी महिलांनी किती मोठं योगदान दिलेलं आहे. अशा महिलांची उदाहरणं आपल्यासमोर खूप आहेत.
जाहिरात
आपल्यातीलच आदिवासी समाजातील एक भगिनी मा. द्रौपदी मुर्मू सध्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत आणि देशाचे सर्व आर्थिक व्यवस्थापन अर्थमंत्री निर्मला सीतारामन पाहत आहेत. म्हणजे दीडशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशाची अर्थव्यवस्था पाहणाऱ्या त्या देखील एक भगिनी आहेत. म्हणून आपण कुठेही कमी नाही आहोत, हे सर्व महिलांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला कोणाशी भांडायचं नाही, तर मांडायचं आहे की आम्ही सुद्धा काही करू शकतो, हे दाखवून द्यायचं आहे. कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना महिलांनी स्वतःसाठी थोडासा का होईना वेळ काढावा. सर्वांच्या आरोग्यासोबत स्वतःचंही आरोग्य सांभाळावं. आपल्या परिवारावर प्रेम तर कराच, परंतु स्वतःवरही प्रेम करा, असा सल्ला त्यांनी महिला भगिनींना दिला.
जाहिरात
पुढे म्हणाल्या, शिक्षणाला वय नसते. म्हणून आपण आयुष्यभर शिकत राहायचं असतं. मी आमदार झाले म्हणजे मी मोठी झाले असं नाही. तर मी आधी महिला मंडळात महिलांना एकत्र करून त्यांचे बचतगट सुरू केले. त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं ठरवलं. बऱ्याच महिलांना बँकेची ओळखही नव्हती. तशी आजची परिस्थिती महिलांसाठी अतिशय चांगली आहे, परंतु अशी परिस्थिती पूर्वीच्या काळी नव्हती. अनेक वर्षांपूर्वी काही प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नासाठी महिला एकत्र आल्या आणि त्या लढा दिला. तो लढा त्यांनी जिंकला, मग जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा व्हायला लागला. याचा अर्थ असा की आपण सर्व महिला एकत्र आलो की आपली ताकद मोठी होते, हे आपल्याला यातून शिकायला मिळतं. म्हणून सर्व महिला भगिनींना माझं सांगणं आहे की एकजुटीचं बळ हे सर्वात मोठं आहे.
माझ्याकडे काही नाही, याचा विचार सोडून आपल्याकडे काय आहे ते बघा.ज्यावेळी आम्ही महिला बचतगटांची चळवळ सुरू केली, तेव्हा सर्वजण गमतीने आम्हाला म्हणायला लागले की दोन बायांचं जमत नाही, तर ह्या ताई महिलांचे एकत्र बचतगट तयार करायला निघाल्या. पण असं काही घडलं नाही. आज कोटीं रुपयांचा निधी महिला बचतगटांनी जमवला आहे. बचतगट चळवळीमुळे महिलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला. त्या पुढे येऊन बोलू लागल्या, आपले प्रश्न मांडून सोडवू लागल्या. महिलांना बँकेची ओळख नव्हती, व्यवहार कसा करायचा याचं ज्ञान नव्हतं. परंतु महिलांना सातत्यपूर्वक मार्गदर्शन केल्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि हिम्मत तयार झाली. त्या मोठ्या आशेने आर्थिक व्यवहार पाहू लागल्या आणि परिवारामध्ये त्यांना प्रतिष्ठा निर्माण झाली. कोपऱ्यातली केरसुणी समजली जात होती, मात्र तसं नाही; ती लक्ष्मी असून तिला कळतं की जमवलेले पैसे हे फक्त प्रपंचासाठीच खर्चायचे असतात. यावेळी विधवा महिलांच्या बाबत बोलताना त्या म्हणाल्या की, विधवा होणं हा तिचा गुन्हा नाही, तिच्यावर आलेलं ते संकट आहे. तिला सांभाळून घेणं ही आपली जबाबदारी आहे. तिचा यथोचित सन्मान राहणं गरजेचं आहे, असे आवाहन त्यांनी सर्व महिलांना केले.