कारगिलच्या शौर्यगाथेतून विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवेची प्रेरणा घ्यावी – सुमित कोल्हे

कारगिलच्या शौर्यगाथेतून विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवेची प्रेरणा घ्यावी – सुमित कोल्हे
संजीवनी सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये कारगिल विजय दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा

Kopargaon vijay kapse दि २८ जुलै २०२६: कारगिल युद्धातील शूर जवानांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या बलिदानातून राष्ट्रसेवेची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी सैन्यदलात दाखल होण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले.
संजीवनी सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्याचे सुभेदार वैभव कदम उपस्थित होते. यावेळी प्राचार्य कैलास दरेकर, कॅम्पस अॅडमिन व माजी सैनिक विजय भास्कर, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमित कोल्हे म्हणाले की, संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली संजीवनी शैक्षणिक समूह सातत्याने प्रगती करत आहे. कारगिल युद्धाच्या आठवणी जागवत त्यांनी सांगितले की, १९९९ मधील युद्धादरम्यान संपूर्ण देश दूरदर्शनवर घडामोडी पाहत होता आणि भारताच्या विजयाचा प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटत होता. आजही त्या शौर्यगाथा विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती, शिस्त आणि समर्पणाची प्रेरणा देतात.

प्रमुख पाहुणे सुभेदार वैभव कदम यांनी कारगिल युद्धातील अनुभव कथन करत २६ जुलै १९९९ रोजी भारताने शौर्य, धैर्य आणि अटळ जिद्दीच्या बळावर ऐतिहासिक विजय संपादन केल्याचे सांगितले. उंच पर्वतरांगांवरील शत्रूचा मुकाबला करत भारतीय सैन्याने बोफोर्स तोफा आणि तिन्ही सैन्यदलांच्या समन्वित कारवाईच्या जोरावर विजय मिळविला. या युद्धात भारताचे ५२७ जवान शहीद झाल्याची आठवण त्यांनी करून दिली.
यावेळी त्यांनी संजीवनी संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी सुरू केलेल्या भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचा विशेष उल्लेख केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देशसेवेची संधी उपलब्ध करून देण्यात या केंद्राचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. सातत्य, संघर्षाची तयारी आणि सहनशीलतेच्या बळावर यश मिळविण्याचा संदेश देत सैनिकी शाळा केवळ शिक्षण देत नाही, तर राष्ट्रनिष्ठ, शिस्तप्रिय आणि संस्कारक्षम नागरिक घडविते, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य कैलास दरेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कारगिल युद्धातील शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणादायी गाथा विद्यार्थ्यांसमोर उलगडली. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांना अभिवादन करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शावर चालावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष सूर्यवंशी यांनी केले.



