एस.एस.जी.एम. महाविद्यालयात नवप्रवेशित कला, वाणिज्य व बी.बी.ए. विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग संपन्न

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात नवप्रवेशित कला, वाणिज्य व बी.बी.ए. विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग संपन्न
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात नवप्रवेशित कला, वाणिज्य व बी.बी.ए. विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग संपन्न

Kopargaon vijay kapse दि २८ जुलै २०२६ –: रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष कला, वाणिज्य व बी.बी.ए. वर्गातील नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दि. २७ व २८ जुलै रोजी आयोजित दोनदिवसीय उद्बोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची ओळख, विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती तसेच करिअरविषयक मार्गदर्शन या कार्यक्रमातून देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालयात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व कौशल्यविकास उपक्रम राबविले जातात. प्रत्येक विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची प्रभावी ओळख व्हावी आणि महाविद्यालयीन शिक्षणाशी सहज जुळवून घेता यावे यासाठी ब्रिज कोर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महाविद्यालयातील प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविताना शिस्त, जबाबदारी आणि आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचे पालन करणे हेच यशस्वी व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.”

यावेळी विविध विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना आपल्या विभागांची तसेच महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली. आय.क्यू.ए.सी.विषयी डॉ. निलेश मालपुरे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी प्रा. डॉ. ए. बी. भागवत, शिष्यवृत्ती योजनांविषयी श्री. धीरज सोनवणे, विद्यार्थी विकास मंडळाविषयी डॉ. माधव यशवंत, परीक्षा विभागाविषयी डॉ. देविदास रणधीर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाविषयी डॉ. सीमा चव्हाण, शॉर्ट टर्म कोर्सेसविषयी प्रा. तानसेन रणदिवे, संशोधन विभागाविषयी डॉ. विलास गाढे, राष्ट्रीय सेवा योजनेविषयी प्रा. डॉ. बंडेराव तऱ्हाळ, सांस्कृतिक विभागाविषयी प्रा. संतोष पवार, एन.सी.सी. विभागाविषयी प्रा. चंद्रभान चौधरी, ग्रंथालयाविषयी प्रा. चंद्रशेखर खैरनार, जिमखाना विभागाविषयी डॉ. विशाल पवार, प्लेसमेंट व करिअर मार्गदर्शनाविषयी प्रा. दिलीप भोये तसेच महिला अत्याचार प्रतिबंधक समितीविषयी डॉ. उज्ज्वला भोर यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधा, सेवा व विविध संधींची सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच कु. ईश्वरी वाकचौरे, चि. सार्थक घोडके आणि चि. तेजस संवत्सरकर यांनी मनोगत व्यक्त केले.

उद्बोधन कार्यक्रमाच्या समारोप सत्रासाठी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा येथील प्रभारी कुलसचिव डॉ. विजय कुंभार हे प्रमुख पाहुणे म्हणून दूरदृष्टी प्रणालीद्वारे सहभागी झाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या करिअरचा भक्कम प्लॅटफॉर्म असून या व्यासपीठाचा योग्य उपयोग करून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या ध्येयाची दिशा निश्चित करावी. नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आयोजित उद्बोधन कार्यक्रम ही अत्यंत स्वागतार्ह व उपयुक्त संकल्पना आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरविषयी एस.एस.जी.एम. महाविद्यालय अत्यंत जागरूक असून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत योग्य मार्गदर्शन, कौशल्यविकास आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध संधी उपलब्ध करून देत आहे. परंपरागत शिक्षणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान, नव्या कौशल्यांचा विकास आणि बदलत्या काळातील संधींचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यावर भर न देता स्वतःचे करिअर घडविण्यासाठी स्पष्ट ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करावेत. आयुष्याच्या प्रवासात योग्य दिशा ठरविणे हीच यशाची गुरुकिल्ली असून विद्यार्थ्यांकडे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी भरपूर वेळ आणि संधी उपलब्ध आहेत. त्या संधींचा योग्य उपयोग केल्यास प्रत्येक विद्यार्थी निश्चितच यशस्वी होऊ शकतो.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व प्रमुख पाहुण्यांचा परिचय वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत यांनी करून दिला. विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी, कला, वाणिज्य व बी.बी.ए. विभागातील सर्व प्राध्यापक तसेच नवप्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील काकडे यांनी केले, तर आभार प्रा. महेश दिघे यांनी मानले.



