सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात – हिरालाल पगडाल

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात – हिरालाल पगडाल
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात – हिरालाल पगडाल
संगमनेर विजय कापसे दि ११ जानेवारी २०२६– संगमनेर तालुका कोरडवाहू, दुष्काळी तालुका म्हणून प्रसिध्द होता.या तालुक्याचे नंदनवनात रूपांतर करण्याचे श्रेय नि:संशयपणे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना जाते.संगमनेर तालुक्याचा जो काही विकास झाला तो सहकारी चळवळीतून झाला,त्या सहकाराचे नेतृत्व भाऊसाहेब थोरातांनी केले आहे.

भाऊसाहेब थोरात यांच्या जीवन कार्याचे दोन भाग पडतात पहिला भाग हा स्वातंत्र्य चळवळीचा आहे,विद्यार्थी दशेत असतांना ते अण्णासाहेब शिंदे,भास्करराव दुर्वे यांच्या संपर्कात आले.भास्करराव दुर्वे नाना यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले होते,8 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधींनी ब्रिटिशांना चलेजावचा इशारा दिल्यानंतर,इंग्रज सरकारने काँग्रेसच्या नेत्यांची धरपकड केली,गांधी,नेहरू, आझाद, पटेल इ.महत्वाचे नेते तुरुंगात डांबले,त्यामुळे देशात खूप मोठा आगडोंब उसळला,ब्रिटिश सरकारला घालवण्यासाठी लोकांनी संप,मोर्चे हरताळ पाळून उग्र आंदोलने केली.ब्रिटिशांनी गोळीबार,धरपकड, बॉम्बवर्षाव आदी मार्गाने हे आंदोलन दडपले,थोडा काळ स्मशान शांतता पसरली,परंतु पुन्हा उठाव सुरु झाले.देशात भूमिगत आंदोलन सुरु झाले,त्याचे नेतृत्व साने गुरुजी,अच्युतराव पटवर्धन आदींनी केले.नगर जिल्ह्यात या भूमिगत आंदोलनाचे नेतृत्व दुर्वे नानांकडे आले,अण्णासाहेब शिंदे,धर्मा पोखरकर,भाऊसाहेब थोरात आदी त्यांचे सहकारी होते.

दुर्वे नानांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब, भाऊसाहेब आदी मंडळींनी पट्टाकिल्ला परिसरात भूमिगत आंदोलन केले,टेलिफोनचे खांब पाडणे, तारायंत्राच्या तारा तोडणे,रेल्वे रूळ उखडने,पोस्ट ऑफिस आणि सरकारी कचेरीवर तिरंगा फडकवने इत्यादी प्रकारचे कार्य करून या मंडळींनी इंग्रजांना सळो कि पळो केले,हे कार्य करतांना या सगळ्या मंडळींना अटक झाली,तुरुंगवास भोगावा लागला.तुरुंगात असतांना अण्णासाहेब शिंदे यांनी साम्यवादी चळवळीचा अभ्यास केला,त्या विचाराने ते प्रभावित झाले , तुरूंगातून बाहेर येताच त्यांनीं कम्युनिस्ट पक्षाचे सभासदत्व स्वीकारले,अण्णासाहेब शिंदे यांचे समवेत भाऊसाहेब थोरात देखील कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले आणि त्यांनी विडी कामगारांची संघटना मजबूत करून कामगार चळवळीचे नेतृत्व केले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कम्युनिस्टांनी काही उठाव केले ते मोडून काढण्यात सरकारला यश आले.कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिकेवर चौफेर टीका होऊ लागल्याने भाऊसाहेब नाराज झाले,त्यांनी चळवळीपासून स्वत:ला अलिप्त केले.

जोर्वे येथील शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली. स्वत:चे गाव आणि शेतीत लक्ष केंद्रित केल्यानंतर, भाऊसाहेब थोरातांना जोर्वे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली .या संधीमुळे भाऊसाहेब थोरातांचे पुढील सारे जीवन बदलले,ते सहकारी चळवळीकडे आत्कुष्ट झाले.सहकार चळवळीत खूप ऊर्जा आहे,त्यातून लोकांचे प्रश्न सोडवता येतात याची त्यांना खात्री पटली.येथूनच त्यांच्या जीवनातील दुसर्या टप्प्याची सुरुवात झाली. रचनात्मक कामाची उभारणी सुरु झाली.
जोर्वे सेवा सोसायटीचे कामाचे माध्यमातून त्यांचा तालुका सुपरवायझिंग फेडरेशनशी संबंध आला.त्याचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालत आले.तालुका सुपरवायझिंग फेडरेशनचे काम करतांनाच भाऊसाहेब व त्यांच्या सहकार्यांनी संगमनेर तालुका शेतकी संघाची स्थापना केली.या संघाच्या मार्फत शेतकर्यांना बियाणे,खते, कृषीपम्प इत्यादी शेतीपूरक साहित्य विक्री चालू केली,हा शेतकी संघ त्यांनी किफायतशीर व दर्जेदार पध्दतीने चालवल्यामुळे शेतकर्यांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास निर्माण झाला.त्यातून संगमनेरला सहकारी साखर कारखाना काढला पाहिजे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला,कारखान्यासाठी शेयर गोळा करणे हे मोठे आव्हानात्मक काम होते,त्यासाठी त्यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्या समवेत तालुक्यात भ्रमंती केली व शेयर गोळा केले.याच दरम्यान यशवंतराव चव्हाणांच्या मध्यस्थीने अण्णासाहेब शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी कम्युनिस्ट पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला, भाऊसाहेबांनी देखील त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
1962 सालच्या निवडणुकीत अण्णासाहेब शिंदे खासदार तर बी जे खताळ पाटील आमदार म्हणून निवडून आले दोघेही मंत्री झाले.त्यामुळे संगमनेर साखर कारखाना निर्मितीच्या कामाला गती आली,दोन्ही मंत्र्यांनी या कामी मोलाचे सहकार्य केले.याच काळात अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन पदावर भाऊसाहेब थोरात यांची निवड झाली.
केंद्रात अण्णासाहेब शिंदे मंत्री, राज्यात खताळ पाटील मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन भाऊसाहेब थोरात यांमुळे संगमनेर साखर कारखान्याच्या कामाला गती आली.केंद्रातून परवानगी मिळाली,राज्यसरकारने भाग भांडवल,कर्ज , निधी उभारणीस सहकार्य केले. जिल्हा बँकेने भक्कम आर्थिक पाठिंबा दिला.यांमुळे 1967 साली संगमनेर साखर कारखाना प्रत्यक्ष सुरु झाला,या कारखान्याची उभारणी आणि प्रत्यक्ष गाळप यात भाऊसाहेबांनी स्वत:ला झोकून दिले होते,त्यामुळे विठ्ठलराव विखे आणि भाऊसाहेब धुमाळ या शासननियुक्त चेअरमनच्या प्राथमिक कालखंडानंतर पहिल्यांदा जी निवडणूक झाली त्यात सभासदांनी कारखान्याचे नेतृत्व भाऊसाहेब थोरात यांच्याकडे सोपवले . भाऊसाहेबांनी देखील कारखान्याचे व सहकार चळवळीचे नेतृत्व समर्थपणे करून दाखवले.
साखर कारखाना चालवण्यासाठी उसाची उपलब्धता महत्वाची असते,ऊस पिकासाठी भरपूर पाणी लागते,तालुक्यात ऊस लागवड वाढवण्याची मोहीम संगमनेर साखर कारखान्याने हाती घेतली, त्याकरिता हरिश्चंद्र पाणीपुरवठा संस्था स्थापन केली,तिच्या मार्फत प्रवरा नदीच्या दोन्हीबाजूला 10 किमी लांबीपर्यंत लिफ्ट इरिगेशन योजना राबवण्याचा सपाटा लावला,त्याला जिल्हा बँकेने अर्थपुरवठा केला,त्यातून तालुक्यात ऊस क्षेत्र वाढले परंतु त्यातून नवापेच निर्माण झाला.पूर्वेकडील तालुक्यांनी संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीतून पाणी उपसण्याला विरोध केला. भंडारदरा धरणातील पाण्याचे ब्लॉकनुसार जे वाटप होते त्यात संगमनेर तालुक्याला थेंबभर पाणी देखील मिळालेले नव्हते.पूर्वेकडील नेते संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांना पाणी चोर म्हणून हिणवू लागले. या विरुध्द भाऊसाहेबांनी मोठा उठाव केला,जनआंदोलने झाली, त्याला यश आले. प्रवरा नदीच्या पाण्याचे फेरवाटप करणे शासनाला भाग पडले. संगमनेर अकोले तालुक्याला हक्काचे 30% पाणी मिळाले.
भाऊसाहेबांनी साखर कारखाना काटकसरीने व सचोटीने चालवला,लबाडी,स्वार्थ,फसवणूक यांपासून सहकारी चळवळ बाजूला ठेवली. भाऊसाहेब थोरात यांच्या करारी,चारित्र्यसंपन्न , परखड ,सुस्पष्ट, दूरदर्शी, शिस्तबध्द नेतृत्वामुळे कारखान्याची प्रगती झाली,या कारखान्याने शेतकर्यांच्या उसाला इतर कारखान्यांच्या तुलनेत सतत अधिक भाव दिला,त्यामुळे कारखान्याचा देशभर नावलौकिक वाढला.
लोकांनी निवडून दिलेल्या सहकारातील प्रतिनिधींनी संस्थेच्या हिताची काळजी करायची असते,त्यातून स्वत:साठी काही घ्यायचे नसते,उलट स्वत:चेच काही संस्थेला देता आल्यास द्यावे अशी त्यांची शिकवण होती.
1977 साली भाऊसाहेब थोरात काँग्रेसपक्षातर्फे विधानसभेला उभे राहिले.या निवडणुकीत त्यांनी माजीमंत्री बी.जे.खताळ पाटील या दिग्गज उमेदवाराचा पराभव केला.भाऊसाहेब थोरात आमदार झाले.या आमदारकीचा उपयोग त्यांनी निळवंडे धरणाची परवानगी मिळवण्यासाठी केला. निळवंडे धरण हाच संगमनेर तालुक्यातील पाणी टंचाई घालवण्याचा उत्तम उपाय आहे अशी त्यांची पक्की धारणा होती.निळवंडे धरण व्हावे यासाठी त्यांनी मोठमोठ्या पाणी परिषदा घेतल्या,राज्य सरकारला निळवंडे धरणाची अपरिहार्यता पटवून दिली.डावा आणि उजवा कालवा काढला तर खूप मोठे शेती क्षेत्र ओलिताखाली येईल हे त्यांनी दांडेकर,देऊस्कर, देशमुख या त्रिसदस्यीय समितीला पटवून दिले.धरणाच्या परवानगीतील सर्व अडथळे दूर केले.धरणाला परवानगी तर मिळ्वलीच,पण निळवंडे कालव्याचे भूमिपूजन देखील त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात घडवून आणले.भाऊसाहेब थोरात आमदारकीत रमले नाहीत. त्यांना अकारण लोक अनुनय करणे मान्य नव्हते.आमदारांना तर लोक अनुनय करण्यावाचून पर्याय नसतो.त्या मुळे ते पुन्हा कधी आमदारकीच्या नादी लागले नाहीत.आमदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले नाहीत.
शेतकर्यांना मीटर नुसार वीजबिल येत असे,ते शेतकर्यांना परवडत नव्हते,त्याचवेळी राज्यातील उद्योगांना मोठ्या प्रमाणावर सवलतीच्या दराने वीज पुरवठा केला जात होता.हे धोरण अन्याय्यकारक आहे अशी भाऊसाहेबांची भूमिका होती.शेतकर्यांना मिटर ऐवजी अश्वशक्तीनुसार बिल आकारावे अशी त्यांची मागणी होती.त्यासाठी त्यांनी राज्यभर फिरून या मागणीच्या मागे शेतकर्यांचा जनाधार उभा केला. ऐतिहासिक मीटर हटाव आंदोलन केले,राज्यभर त्याचा बोलबाला झाला. मीटर हटाव आंदोलन यशस्वी झाले. शासनाने मीटर ऐवजी अश्वशक्तीनुसार वीजबिल आकारणी करण्याचा निर्णय घेतला.
आण्णासाहेब शिंदे केंद्रात कृषी मंत्री होते,त्यांच्या कार्यकाळात वर्गीस कुरियन यांनी गुजराथ मध्ये अमूल दूध प्रकल्प यशस्वी करून दाखवला,देशात श्वेतक्रांती झाली.भाऊसाहेब थोरात या क्रांतीने प्रभावित झाले,त्यांनी तालुक्यात आधुनिक पध्दतीने दुग्ध व्यवसाय करण्याचा चंग बांधला.त्यासाठी जिल्हा बँकेची मदत घेतली.अधिक दूध देणार्या संकरित दुधाळ गायींचे वाटप केले,त्याचे पालन व संगोपन यासाठी शास्त्रशुद्ध माहिती देणारी मदतयंत्रणा उभी केली.चारा,औषधे,पशुखाद्य, व्हेटरनरी डॉक्टर्स उपलब्ध करून दिले,तालुक्यात दूध धंद्यात क्रांती घडवून आणली.
संगमनेर तालुक्यात आज जवळपास दररोज पाच लाख लिटर दुधाचे संकलन होते,राजहंस ब्रँड सहकारी दुधाचा राज्यात मोठा नावलौकिक आहे.भाऊसाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यात गावोगावी दुधाळ गायींपालन,दूध संकलनासाठी सहकारी दूध डेअरी,त्याला जोडून पतसंस्था,आणि शाळा याची साखळी निर्माण केल्यांमुळे तालुक्यात मोठा रोजगार निर्माण झाला,सुबत्ता निर्माण झाली.
भाऊसाहेब थोरात यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली,या संधीचे त्यांनी सोने केले. मासेमारी, कुक्कुटपालन, पाणीपुरवठा, पतसंस्था यांच्यासाठी खूप चांगले निर्णय त्यांच्या काळात झाले.त्यांनी नाबार्डचे संचालक म्हणून काम केले, त्याचाही फायदा त्यांनी राज्याला करून दिला.
भाऊसाहेब थोरात यांनी लेखक,कवी,कलावंत, नाटककार,शास्त्र-ा ,पत्रकार ,खेळाडू यांचा सातत्याने सन्मान केला.स्वत:ही काही लेखन केले.भाऊसाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नामुळे संगमनेर तालुक्याचा खूप मोठा विकास झाला आहे.त्यामुळे त्यांना संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून संबोधले जाते.त्यांनी सहकार चळवळ वाढवली फुलवली,यशस्वी करून दाखवली म्हणूनच जनतेने त्यांना सहकारमहर्षी हि पदवी बहाल केली.
– हिरालाल पगडाल, संगमनेर



