आ.थोरात यांच्याकडून निमगाव टेंभी येथील वर्पे कुटुंबीयांचे सांत्वन
वन्य प्राण्यांचे वाढते हल्ले चिंताजनक – आमदार थोरात
संगमनेर प्रतिनिधी दि १५ सप्टेंबर २०२४–आपल्या घराजवळ काम करत असताना गिन्नी गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या निमगाव टेंभी येथील सौ संगीता शिवाजी वरपे यांच्या कुटुंबीयांचे काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट घेऊन सांत्वन केले याचबरोबर मानवी वस्तीत वन्य प्राण्यांचे वाढत चाललेले हल्ले चिंताजनक असल्याचे ही काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
निमगाव टेंभी येथे मयत सौ.संगीता शिवाजी वर्पे यांच्या कुटुंबीयांची विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली.यावेळी समवेत अहमदनगर जिल्हा शहराध्यक्ष किरण काळे, शिवाजी आहेर,नानासाहेब वर्पे, रमेश वरपे, बाळासाहेब राहणे प्रकाश कोटकर डॉ. प्रमोद पावसे आदींसह गावातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ.संगीता वरपे या आपल्या घराजवळ धुणं धुत होत्या यावेळी शेजारी असलेल्या गिन्नी गवतात बिबट्या दबा धरून बसला होता. त्याने अचानक संगीता वरपे यांच्यावर पाठीमागून हल्ला केला व मानेला पकडले याचबरोबर त्यांना ओढीत नेले होते.यामुळे त्यांच्या मानेला मोठी जखम झाली .ही बातमी समजताच आमदार बाळासाहेब थोरात यांनी तातडीने मदतीने सूचना दिल्या. सौ.संगीता वरपे यांना दवाखान्यात नेल्यानंतर त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
आमदार बाळासाहेब थोरात यांनी वरपे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी ते म्हणाले की, सध्या मानवी वस्ती मध्ये होणारे बिबट्यांचे हल्ले चिंताजनक आहे. अशा हल्ल्यामुळे सर्वत्र लहान मुले त्याचप्रमाणे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर प्रभावी उपाय योजना म्हणून वन विभागाने जास्तीत जास्त यंत्रणेचा वापर करून बिबटे व इतर वन्य प्राण्यांना मानवी वस्तीत येण्यापासून कसे रोखता येईल यासाठी काम केले पाहिजे. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून शासन स्तरावरून जास्तीत जास्त मदत या कुटुंबाला मिळाली पाहिजे याबाबतच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. यावेळी उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील यांच्यासह वन विभागाचे व शासकीय अधिकारी उपस्थित होते.