धर्माचे राजकारण हाच अधर्म – प्रा. शरद बाविस्कर
धर्माचे राजकारण हाच अधर्म – प्रा. शरद बाविस्कर
सरकारी योजनांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा- उज्वल कुमार चव्हाण; जय हिंद ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये चर्चासत्र
संगमनेर विजय कापसे दि ६ ऑक्टोबर २०२४– राजकारण हे सर्वांच्या मानवी व्यवहाराचे क्षेत्र आहे. लोकशाही हा मानवी मूल्यांचा नैतिक अधिकार असून प्रत्येकाने या मूल्यांशी कटिबद्ध राहिले पाहिजे. लोकशाहीच्या नावाखाली राजकारणामध्ये धर्माचा वापर करणे हाच अधर्म असल्याची टीका जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक व लेखक प्रा शरद बाविस्कर यांनी केली आहे. तर कोणत्याही सरकारी योजनांमध्ये लोकसहभाग महत्त्वाच्या असल्याचे डॉ. उज्वल कुमार चव्हाण यांनी म्हटले आहे.
जैन हिल्स येथील गांधी तीर्थ येथे जय हिंद लोकचळवळ व गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जय हिंद ग्लोबल कॉन्फरन्स मधील दुसऱ्या दिवसाच्या लोकशाही सत्रात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ईडीचे माजी उपसंचालक डॉ.उज्वलकुमार चव्हाण, जळगाव जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड संदीप पाटील, विष्णू भंगाळे, सौ दुर्गाताई तांबे, समन्वयक शैलेंद्र खडके आदि उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना प्रा बाविस्कर म्हणाले की, राजकारण हे सर्व क्षेत्रांचे नेतृत्व करते आहे प्रत्येक व्यक्तीची समान प्रतिष्ठा लोकशाहीमध्ये राखली जावी हा भारतीय संविधानाचा पाया आहे. मात्र सध्या लोकशाहीच्या मूल्यांना हरताळ फासला जात असून धनिकांच्या हाती ही एकवटू लागली आहे. बहुजन समाज वाचन आणि विचारातून बाहेर पडल्याने त्यांच्यावर गुलामगिरी लादली जात आहे.
महाराष्ट्राच्या उभारणीसाठी अनेकांनी आयुष्य दिले म्हणून पुरोगामी महाराष्ट्र हा देशांमध्ये वेगळा आहे. येथे सभ्यता व संस्कृती आहे. मात्र सध्या राजकीय अस्थिरता आणि गढूळ वातावरण चिंताजनक आहे. हे सर्व बदलण्यासाठी युवकांनी श्रद्धेच्या जागी साहित्य संस्कृतीचे संवर्धन करून लोकशाही ही जनकल्याणाचे साधन व साध्य असल्याने ती अधिक बळकट करण्यासाठी वाचा, विचार करा आणि बोला असा सल्लाही तरुणांना दिला.बतर ईडीचे मा. संचालक उज्वल कुमार चव्हाण म्हणाले की, आता अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर भौतिक सुविधा आणि स्वतःचे स्टेटस हे सुद्धा मूलभूत गरज वाटू लागली आहे. मी समाजाकरता काही करावे ही जाणीव आता निर्माण होणे ही चांगली बाब आहे. परंतु याकरता इतरांचा सहभाग घ्या सर्वांशी बोला. माणसांना समजून घ्या असे ते म्हणाले.
तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, अहंकार गर्व बाजूला ठेवून संवाद साधा. संवादाने समाज एकत्र येतो. पर्यावरण संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असून याकरता तरुणांनी काम करावे असे त्या म्हणाल्या. याच सदरात चित्रपट निर्माते नचिकेत पटवर्धन यांनी गांधी विचारांवर काम करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असे आवाहन केले तर कामिनी सुहास यांनीही ग्रामीण विकासासाठी तरुणांशी संवाद साधला. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राज्यभरातून 250 तरुण व तरुणी सहभागी झाल्या आहेत.
जैन समूहाचे गांधी तीर्थ हे गांधी विचारांची तीर्थक्षेत्र – आमदार तांबे
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा विचार हा जगासाठी आजही महत्त्वाचा असून हा शांततेचा समतेचा आणि मानवतेचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जैन समूहाच्या वतीने उभारलेले गांधी तीर्थ हे खऱ्या अर्थाने गांधी विचारांचे तीर्थक्षेत्र ठरले असल्याचे गौरव उद्गार आमदार सत्यजित तांबे यांनी काढले आहे