वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणाऱ्या ३९ बेशिस्त वाहन चालकावर कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई
अचानक कारवाई सुरू झाल्याने अनेक वाहनचालकांची तारांबळ झाल्याची पहावयास मिळत होती
कोपरगाव विजय कापसे दि २४ ऑक्टोबर २०२४– विधानसभा निवडणुकीच्या व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे ॲक्शन मोडवर आले असून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंदे चालकांविरुद्ध तसेच वाहतुकीचे नियम मोडून वाहने चालवणाऱ्या वाहन चालका विरुद्ध त्यांनी आपला मोर्चा वाळवला असून बुधवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी वेगवेगळ्या कलमाने शहर हद्दीत तब्बल ३९ बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध कारवाई केल्याने वाहन चालकांची मोठी तारांबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, सध्या सर्वच रस्त्यावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने सर्वच रस्त्यावर वाहन कोंडीची समस्या निर्माण होऊन अनेकदा वाहन चालकांमध्ये आपापसात वादविवाद होऊन काही कधी कधी तर चक्क पोलीस स्टेशनमध्ये देखील नोंदी झालेल्या आहेत. त्यामुळे आता ऐन सणासुदीच्या व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी तसेच कुठेही वादविवाद होऊ नये या गोष्टीची खबरदारी म्हणून कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आपल्या पोलीस पथकासह शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडून वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांची तपासणी करत बुधवारी दिवसभरात तब्बल ३९ वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर वेगवेगळ्या कलमाने मोटर वाहन कायदे अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे तर यात ५ गुन्हे हे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यावर दाखल केले आहे.
तर दुसऱ्या कारवाईमध्ये कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रोटेगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर येथील मनोज भरतसिंग राजपूर हा २९ वर्षीय आरोपी त्याच्याकडे असलेले अपे रिक्षा (एम.एच.२० टी- ३८४०) मधून बुधवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कोपरगाव ते वैजापूर रोडवर संवत्सर शिवारातील कातकडे पेट्रोल पंपा समोर रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या पादचार्यांच्या जीविताला धोका होईल अशा स्थितीत वाहन चालविताना मिळून आला असता त्याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ४८९/२०२४ कलम बी.एन. एस १२५ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ लिंबोरे हे करत आहे.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सर्व वाहन चालकांना आवाहन केले आहे की सर्वांनी वाहतुकीच्या नियमाचे काटेकोर पालन करत वाहने चालवावी तसेच कोणीही दारू पिऊन वाहने चालवू नये अन्यथा शहर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.