संजीवनी युनिव्हर्सिटीला टेडएक्सचे सभासदत्व

संजीवनी युनिव्हर्सिटीला टेडएक्सचे सभासदत्व
जागतिक किर्तीच्या व्याख्यात्यांचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण
कोपरगांव विजय कापसे दि १४ फेब्रुवारी २०२६– संजीवनी युनिव्हर्सिटीने गुणवत्तेच्या जोरावर टेडएक्स या जागतिक पातळीवर व्यासपिठाचे सदस्यत्व प्राप्त केले. जागतिक किर्तीच्या व्याख्यात्यांच्या मंत्रमुग्ध करणारी व्याख्याने आणि अनुभवाचे सादरीकरणाचा समावेश असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करून या व्यासपिठासोबत आपले नाते जोडले.

न्युयॉर्क येथे मुख्यालय असलेल्या टेडएक्सची जागतिक पातळीवरील व्यासपीठ अशी ओळख आहे. या व्यासपिठाच्या सहकार्याने संजीवनी युनीव्हर्सिटीने, वेगवेगळ्याा क्षेत्रात आपले वैशिष्टपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजीत केला. ग्रामीण महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे, संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे, युनिव्हर्सिटीचे व्हाईस चांसलर डॉ. ए.जी. ठाकुर यांच्यासह युनीव्हर्सिटीचे प्राध्यापक या कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी बोलताना संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे माजी विद्यार्थी व ईव्हीपी आणि चीफ इन्फॉर्मेशन अँड डिजिटल ऑफिसर, वेस्का, अमेरिका तसेच जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त तंत्रज्ञान व नेतृत्व क्षेत्रातील तज्ञ डॉ. आकाश खुराणा म्हणाले की, यंत्रे विचार करू लागतात, तेव्हा आव्हान केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहत नाही.
डॉक्टर ऋषिंद्र सिन्हा यांनी आवडीतील बदल करिअरच्या नव्या सीमा घडवतात या विषयावर प्रकाश टाकला. आवड गेमिंगला केवळ मनोरंजनातुन जागतिक करिअर परिसंस्थेत कशी रूपांतरीत करू शकते, याचा उलगडा त्यांनी केला.

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे माजी विद्यार्थी व टेक महिंद्राचे चिफ इनोव्हेशन ऑफिसर डॉ. निखिल मल्होत्रा यांनी ‘जेव्हा कृत्रिम बुध्दीमत्ता सर्जनशिल भागीदार बनते’ या विषयावर आपले विचार मांडले. जागतिक स्तरावरील नवोपक्रम नेते असलेले आणि कृत्रिम बुध्दिमत्ता, वर्ल्ड मॉडेल्स, क्वॉंटम कॉम्प्युटिंग, न्युरोसायन्स प्रेरित आर्किटेक्चर्स आणि जबाबदार तंत्रज्ञान विकास या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले डॉ.मल्होत्रा म्हणाले, यंत्रे मानवी सर्जनशिलतेची जागा न घेता ती अधिक सक्षम करू शकतात. मानवी अंतदृष्टी आणि संगणकिय बुध्दिमत्ता यांच्यातील सहकार्याला महत्व आहे.

प्रसिध्द सामाजिक उद्योजक, तरूणांमध्ये शिक्षण, कौशल्य विकास आणि सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या अग्रणी मंझिल वेलफेअर सोसायटीचे सह संस्थापक रवि गुलाटी यांनी ‘क्षमतांपेक्षा संधी का अधिक महत्वाची आहे’ या विषयावर आपले विचार मांडले. डॉ. भरत केळकर यांनी ‘संकट काळात एक पाऊल पुढे जाण्याचा खरा अर्थ’ या विषयावर आपले विचार मांडले. त्यांनी येमेन आणि सिरिया यांसारख्या संघर्षग्रस्त भागांमध्ये जाऊन युध्दग्रस्त नागरिकांना पुरवीलेल्या वैद्यकीय सेवेबाबतचे अनुभवकथन केले. ग्लोबल डिलिव्हरी एचआर लिडर असलेल्या राजिता सिंग म्हणाल्या, प्रामाणिकपणा बहुतेक वेळा मोठ्या क्षणात तुटत नाही, तो हळुच, आपण योग्य ठरवू लागलेल्या छोट्या तडजोडींमध्ये निसटतो.
सामाजिक उद्योजिका सुमा उईके म्हणाल्या ‘सामुहिक बचत ग्रामीण जीवनात कसे परिवर्तन घडवु शकते हे आम्ही महिलांनी दाखवून दिले. छोटी बचत, कौशल्य प्रशिक्षण आणि सामुहिक प्रयत्नांच्या बळावर शाश्वत उपजिविकेचे साधन उभारता येते’. तसेच संजीवनी अकॅडमीची तीन पुस्तकांची बाल लेखिका आद्या आनंद काळे व बाल संशोधक सौल सारंग पाटील यांनी आपले अनुभव केले. डॉ. सुधांशु भट यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून आभार मानले.



